माती ला जपा...... मिलिंद जि गोदे
नमस्कार मंडळी जगात तंत्रज्ञानविषयक बदल विलक्षण वेगाने होत असल्याने अनेक मानसिक व सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या मते सध्याच्या जगात राहणे सुखाचे उरलेले नाही. काही औद्योगिक देशांत दर दहा वर्षांनी आर्थिक मंदीची लाट दुप्पट होत चालली आहे. अमेरिकेत मोटार अपघात, खून या खालोखाल मृत्युंच्या कारणात आत्महत्यांचा तिसरा क्रमांक लागतो. व्यक्तीव्यक्तीमधील दुरावा, सामाजिक वेगळेपणाची भावना, असुरक्षितता, भविष्याबद्दल अनिश्चितता, आणि सततची सामाजिक वंचना यामुळे धार्मिक मूलतत्ववाद सर्वत्र बोकाळत चालला आहे. बहुसंख्य लोकांच्या जीवनामध्ये साचेबंदपणा निर्माण झाला आहे., आपल्या देशात एवढी सुपीक जमीन, विपुल पाणी आणि मुबलक सूर्यप्रकाश असूनही आपल्या देशातील कोट्यवधी जनतेला कमालीच्या दारिद्रयात, रोगराईत व अज्ञानात जीवन कंठावे लागत आहे. त्यातून मुक्त व्हायचे असेल तर विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. त्याचबरोबर आपली नैसर्गिक वैशिष्ट्ये जपली पाहिजेत. सहिष्णुता, अनुकंपा व सुविचारांपासून आर्थिक संपन्नता व्यर्थ आहे. उपभोक्तावादावर व चंगळवादी प्रवृत्तींवर संयमाने मात केली पाहिजे. अ...